
जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी ११ ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ’; युवकांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी
रत्नागिरी, दि. ९ ) : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. या भव्य उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या महाकुंभांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हास्तरावर तसेच विविध तालुकास्तरांवर एकूण ११ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरीचे सहायक आयुक्त दत्ता दि. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील मेळाव्यांची ठिकाणे:
१. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, ॲड. एन. व्ही. जोशी मार्ग, जिल्हा न्यायालयाजवळ, रत्नागिरी
२. मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, ता. रत्नागिरी
३. राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, आंबव, ता. संगमेश्वर
४. DeCAD देवरुख कॉलेज ऑफ आर्ट ॲन्ड डिझाईन, भागवत संकुल, देवरुख, ता. संगमेश्वर
५. कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ताज सिटी सेंटर, लांजा
६. राजापूर हायस्कूल, राजापूर, ता. राजापूर
७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), अंजनवेल, RGTTL कंपनीजवळ, ता. गुहागर
८. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती), ता. चिपळूण
९. ज्ञानदीप महाविद्यालय (विज्ञान व वाणिज्य), मोरवंड-बोरज, ता. खेड
१०. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता. दापोली
११. लोकनेते गोपीनाथजी मुंडे आर्ट्स, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, मंडणगड
उद्योग व आस्थापनांसाठी मनुष्यबळ मिळविण्याची संधी
या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उद्योग, खासगी कंपन्या व विविध आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार पात्र व कुशल मनुष्यबळ थेट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नियोक्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्याकडील रिक्त पदांची नोंदणी https://forms.gle/MrzGc3ofqq37wwr6 या संकेतस्थळावर करावी, जेणेकरून जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. (०२३५२) २९९३८५ वर संपर्क साधावा.



