जरांगे पाटलांचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही, आता शिष्टमंडळ जाणार नाही, विखेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जे जे निर्णय घेता येणे शक्य होते, तेवढे निर्णय घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनाही अवगत केले. तरीही जरांगे पाटील यांचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही.

त्यांनी आता आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती करतानाच आता त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीला जाणार नाही, अशी कठोर भूमिका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आदी नेते उपस्थित होते. सरकारने सकारात्मक निर्णय घेऊनही जरांगे पाटील जर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत असतील तर त्यांच्याशी चर्चा नको, अशी मानसिकता नेत्यांनी बोलून दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले.

जरांगे पाटलांचे समाधान होत नसेल तर माझ्याकडे पर्याय नाही, आता शिष्टमंडळ चर्चेला जाणार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या सरकारकडे केल्या होत्या. त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने वेगवेगळे निर्णय घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांचा ५८ लाख कुणबी नोंदींचा मुद्दा होता, तो मुद्दाही आम्ही निकाली काढला. या सगळ्या नोंदी आता ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावण्यात येणार आहे. तसेच १० तारखेपासून मंडलनिहाय कॅम्पही सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे असतानाही जर जरांगे पाटील यांचे समाधान होत नसेल तर आमचा नाईलाज आहे. आमच्याकडेही काही पर्याय नाहीत, आता आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, असे विखे म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण स्थगित करावे

जर सरकार दोन पावले पुढे येत असेल तर त्यांनीही काही पावले पुढे टाकली पाहिजेत. शासनाला जे जे करणे शक्य आहे, ते शासनाने केले आहे. त्यांनी आता उपोषण स्थगित केले पाहिजे, अशी सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चावर विखे पाटील म्हणाले…

जर सरकारने मागण्यांसंदर्भात फेरविचार केला नाही तर मुंबईला मोर्चा घेऊन येण्याचे जरांगे पाटील यांचे नियोजन आहे, असे विचारले असता, ‘पुढे काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, सरकारचा नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

जरांगे पाटलांशी अनेकदा चर्चा, मुद्द्यांचे निराकरण केले

मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने अनेकदा चर्चा केली आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे आम्ही निराकरण केले. त्यांनीही विचार करायला हवा. मराठा समाजाच्या प्रश्नांवर आतापर्यंत कुणीही एवढे काम केले नव्हते, तेवढे काम फडणवीस-शिंदे या जोडीने केले आहे, तरीही ते सरकारला लक्ष्य करणार असतील तर हे बरे नाही, अशी खंत विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button