सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! साखर, दूध महागल्याने मिठाईचे दर १५ टक्क्यांनी वाढणार?


  • देशात सणासुदीचा काळ सुरू होण्याच्या तोंडावर वाढलेल्या साखर, दूध आणि इतर कच्च्या मालाच्या किमतींमुळे मिठाईच्या दरांमध्ये किमान १०-१५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गणपती, दसरा आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या दरात ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून महाराष्ट्रात साखरेचा किरकोळ दर आता प्रति किलो ६५ रुपयांच्या वर गेला आहे. मिठाई उत्पादकांच्या मते, ही दरवाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा सणासुदीचा काळ जवळ आला आहे आणि या काळात मिठाईची मागणी सामान्यपणे वाढत असते.

साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणे आणि त्याचबरोबर सुमारे ३० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवली जाणे, यांमुळे साखरेचा पुरवठा मर्यादित झाला असून दरांमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील मिठाई आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांसमोर साखरेच्या वाढत्या दरांसोबतच दुध दरवाढीची समस्याही निर्माण झाली आहे. मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने १ सप्टेंबरपासून सुट्या दुधाच्या दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ केली आहे, ज्यामुळे मिठाई व्यावसायिकांवरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे.

“गेल्या काही महिन्यांत इंधन, दूध, तूप आणि विशेषतः साखर व सुकामेवा यांच्या किमतीत वाढ झाली आहे. २०२५ च्या दिवाळीच्या तुलनेत सर्वच कच्च्या मालाच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता आम्हाला किमती वाढवाव्याच लागतील, कारण वाढीव खर्चाचा हा भार आम्ही यापुढे सहन करू शकत नाही. मिठाई व्यावसायिकांना या वाढीचा काही हिस्सा ग्राहकांवर टाकावा लागेल आणि ही दरवाढ किमान १० ते १५ टक्क्यांच्या दरम्यान असू शकते”, असे फेडरेशन ऑफ स्वीट्स अँड नमकीन मॅन्युफॅक्चरर्सचे महासंचालक फिरोज नकवी यांनी सांगितले. याबाबत सीएनबीसीटीव्ही १८ च्या वृत्तामध्ये उल्लेख आहे.

उत्पादनाचा खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, आता ही वाढ सोसणे शक्य नसल्याचे मिठाई व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मिठाई व्यावसायिकांच्या मते दरवाढीचा दबाव केवळ साखर आणि दुधापुरताच मर्यादित नाही. दुधाच्या वाढलेल्या किमतींमुळे तूप आणि पनीरसारखे दुग्घजन्य पदार्थही महागले आहेत. यामुळे जरी साखरेचे दर दिवाळीपर्यंत कमी झाले तरी मिठाईचे दर कमी होणे कठीण असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button