गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी शहर खड्डेमुक्त होणार, १८ लाखांचे सिमेंट आणि खडी


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे जिओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात येणार असून, यासाठी सुमारे १८ लाख रुपये खर्चुन ३५ टन सिमेंट आणि खडी मागविण्यात आली आहे. आजपासून दिवसरात्र काम करून गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे पावसाळी डांबराने बुजविण्यात येणार आहेत.
शहरातील रस्त्यांनी डागडुजी करण्यासाठी यापूर्वी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात होता. मात्र, पावसाळ्यात वारंवार खड्डे पडत असल्याने यंदा पालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिओपॉलिमर टेक्नोपॅचिंग तंत्रज्ञानराची प्रायोगिक चाचणी पालिकेतर्फे घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर याच पद्धतीने खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या तंत्रज्ञानाने खड्डे भरल्यानंतर रस्त्याचा पृष्ठभाग अधिक मजबूत आणि टिकाऊ राहतो त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक लक्षात घेता रस्त्याची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री ना. उदय सामत यांनी प्रायोगिक पद्धतीने भरलल्या खड्ड्याची पाहाणी करून व्यावर घण मारून कामाची मजबुती तपासली होती. दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी पावसाळी डांबराचा वापर केला जाणार आहे. यासाठी ४१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून, त्यातून अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button