
अखेर पालकमंत्र्यांचा आदेश; गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला!
ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांच्या पाठपुराव्याला यश; बीच बंदच्या निर्णयानंतर निर्माण झालेली नाराजी दूर
रत्नागिरी : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याबाबत अखेर दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबरपासून अचानक बंद करण्यात आलेला गणपतीपुळे बीच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या आदेशानंतर शनिवारपासून (५ सप्टेंबर) पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
समुद्रकिनारा अचानक बंद करण्यात आल्याने गणपतीपुळेतील ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची भेट घेऊन समुद्रकिनारा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
यानंतर शुक्रवारी (४ सप्टेंबर) रत्नागिरी येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार किरण उर्फ भैया सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील सद्यस्थितीची माहिती प्रशासनाला दिली.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा जीव रक्षक दोन सत्रांत कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जयगड पोलिस ठाण्यांतर्गत होमगार्डही तैनात असून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर आवश्यक त्या सुरक्षा सूचना दिल्या जात असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तातडीने पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामपंचायतीने शनिवारपासून समुद्रकिनारा पुन्हा खुला केला असून पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गणपतीपुळे बीच पुन्हा सुरू करण्यासाठी माजी उपसरपंच मयूर केदार, माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे, रवी ठावरे, अविनाश माने, उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव यांच्यासह ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी सातत्याने पाठपुरावा केला.
बीचवर स्वच्छता राखण्याच्या सूचना
समुद्रकिनारा पुन्हा सुरू करताना बीच परिसरात स्वच्छता राखण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या आहेत. गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला झाल्याने ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.
गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पुन्हा गजबजणार असून, पर्यटकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.




