
ऐरोलीतील दहीहंडीत थर कोसळून घणसोलीतील ३४ वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू;
दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाला गालबोट लागणारी दुर्दैवी घटना ऐरोलीत घडली. दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचत असताना अचानक थर कोसळून गंभीर जखमी झालेल्या घणसोलीतील ३४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला.ऐरोलीतील साईनाथवाडी येथे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्वप्निल सदानंद नावर (वय ३४, रा. कोळीवाडा, घणसोली गाव) असे मृत गोविंदाचे नाव आहे. या घटनेमुळे घणसोली कोळीवाड्यासह ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ऐरोली येथील साईनाथवाडीमध्ये ‘देविदास चौगुले प्रतिष्ठान’च्या वतीने शनिवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवासाठी परिसरात गोविंदा पथके दाखल झाली होती. रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घणसोलीतील गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचण्यास सुरुवात झाली. एकावर एक थर रचून गोविंदांनी हंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी अचानक गोविंदांचा तोल गेला आणि मानवी मनोरा कोसळला.मनोरा कोसळल्याने काही गोविंदा खाली पडले. या दुर्घटनेत स्वप्निल नावर गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिक आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.




