
जाचक ठरणारे एनसीएमसी कार्ड रद्द करण्याची जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची मागणी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासातील सवलतींसाठी अनिवार्य केलेले एन.सी.एम.सी. स्मार्ट कार्ड ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक आणि आर्थिक भूर्दंड ठरत आहे. त्यामुळे हे कार्ड रद्द करून आधार कार्डाच्या आधारेच मोफत प्रवासाची सवलत कायम ठेवावी किंवा सवलतीच्या दरात आजीवन ओळखपत्र द्यावे, अशी जोरदार मागणी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीतर्फे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने प्रवास सवलतींसाठी विविध वयोगटांतील पुरुष व महिलांसाठी १९९ रुपये शुल्काचे एन.सी.एम.सी. कार्ड सक्तीचे केले असून या कार्डची वैधता ५ वर्षांची आहे. वास्तविक, महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास पूर्णतः मोफत आहे. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक केवळ चे आपले मूळ आधार कार्ड दाखवून या योजनेचा सहज लाभ घेत आहेत. आधार कार्ड दाखवून या योजनेचा सहज लाभ घेत आहेत. आधार कार्ड दाखवून प्रवास करताना वाहकाकडून केवळ २ रुपये स्वच्छता कर आकारून शून्य मूल्याचे तिकीट दिले जाते आणि याचा हिशोब महामंडळाकडून शासनाला सादर करून परतावा मिळवला जातो. असे असतानाही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५ वर्षांसाठी १९९ रुपये खर्च करून एन.सी.एम.सी. कार्ड काढण्याची सक्ती केली जात आहे. हे कार्ड डिजिटल पेमेंट, मेटो, सिटी बस आणि पार्किंग यांसारख्या विविध सुविधांसाठी उपयुक्त असले, तरी महाराष्ट्रातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागात् व लहान-मोठ्या शहरांमध्ये राहतात.
त्यांना मेट्रो किवा इतर डिजिटल सुविधांचा कोणताही उपयोग होत नाही. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी पालकमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जर एस.टी. महामंडळाला स्वतःचे वेगळे ओळखपत्र हवेच असेल, तर ५ वर्षांची मुदत असलेल्या एन.सी.एम.सी. कार्डऐवजी अवघ्या ५० रुपयांमध्ये एस.टी. महामंडळाचे स्वतंत्र ओळखपत्र देण्यात यावे.




