
फुरुस-आमशेत येथे घर फोडून ४१ हजारांची रोकड लंपास
छतावरील कौले काढून चोरट्यांचा घरात प्रवेश; लोखंडी कपाटासह दोन दानपेट्यांवर डल्ला
खेड : तालुक्यातील फुरुस- आमशेत येथे राहत्या घराच्या छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रकमेसह एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजल्यापासून ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत फुरुस-आमशेत येथे घडली. फिर्यादी फैज अहमद इब्राहिम पस्कर (वय ६३, व्यवसाय शेती) हे घरात नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या छतावरील कौले काढून घरात अनधिकृत प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील ३७ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच हॉलमध्ये ठेवलेल्या दोन दानपेट्या फोडून त्यातील अंदाजे ४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत एकूण ४१ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७.४२ वाजता गुन्हा क्रमांक २८२/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार आरोपी अद्याप अज्ञात असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
घराच्या छतावरील कौले काढून चोरट्याने घरात प्रवेश केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून चोरीचा अधिक तपास केला जात आहे.




