
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचा उत्साह; ५०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा स्तुत्य पुढाकार जलतरण स्पर्धा, ‘रन फॉर राईड’ रॅलीसह विविध खेळांची प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शनीय सामने संपन्न
रत्नागिरी, ): राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी विविध क्रीडा उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील सुमारे ५०० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. मान्यवरांनी विविध मैदानांना भेटी देऊन उपक्रमांची पाहणी केली आणि खेळाडूंशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
विविध स्पर्धा व शिबिरांचे आयोजन:
विद्यार्थी व तरुणांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करणे, नियमित व्यायाम व तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे आणि जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. तीन दिवसांच्या या महोत्सवात:
*कौशल्य प्रशिक्षण शिबिरे: व्हॉलीबॉल, खो-खो, हॉकी, बॅडमिंटन, तायक्वांदो आणि योगा या खेळांचे विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात खेळाडूंना तंत्र, नियम व बारकाव्यांची माहिती देण्यात आली.
- प्रदर्शनीय सामने: विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने रंगले, ज्यामुळे खेळाडूंना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव मिळाला तर क्रीडाप्रेमींना दर्जेदार खेळाचा आनंद घेता आला.
- ‘रन फॉर राईड’ रॅली व जलतरण स्पर्धा: शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या ‘रन फॉर राईड’ रॅलीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला, तर जलतरण स्पर्धेत जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली.
ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने अल्पोपहार, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडवण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.




