
१२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयात सामोपचाराने वाद मिटवण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २ ):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीतर्फे १२ सप्टेंबर, २०२६ रोजी रत्नागिरी. येथील जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. आपले वाद लोक अदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने मिटवून वेळेची व पैशाची बचत करावी आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
पक्षकारांनी आपली संबंधित प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यासाठी आपले वकील, संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर. आर. पाटील यांनी केले आहे.
लोक न्यायालयात प्रामुख्याने पुढील प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाऊन्स प्रकरणे, दिवाणी वाद, वीज कंपन्या, बँका व पतसंस्थांचे थकीत कर्जाबाबतचे वादपूर्व प्रकरणे, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींकडील थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची तसेच मामलेदार कोर्टात प्रलंबित असलेली प्रकरणे.




