
स्मार्ट कार्डचा ‘स्मार्ट’ गोंधळ! ज्येष्ठ नागरिक व महिलांना मनस्ताप; ई-बिक्स कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, जिल्ह्यातून अनेक भागातून तक्रारी
सर्व्हर डाऊन, कार्यालय वेळेवर सुरू नाही, रिचार्जचा घोळ; जिल्ह्यातून देखील अनेक भागातून तक्रारी
रत्नागिरी : एसटीमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड अर्थात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरणाचे काम खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. मात्र या कंपनीच्या कारभारामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
कधी सर्व्हर डाऊन असल्याचे कारण, कधी कार्यालय वेळेवर न उघडणे, तर कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांशी योग्य पद्धतीने संवाद साधला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे या खासगी कंपनीच्या कामकाजावर एसटी प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कार्ड वितरणाच्या वेळी रिचार्जची रक्कम भरूनही काही वेळा कार्डमध्ये अपेक्षित रक्कम जमा न होणे, कमी रिचार्ज दिसणे अशा तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. काही प्रवाशांच्या कार्डमध्ये पैसे उपलब्ध नसल्याने एसटीतील वाहकांकडून पूर्ण तिकिटाचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कार्डसंदर्भातील समस्यांनी त्रस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवासी काउंटरवर संताप व्यक्त करताना दिसत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणी कार्डवर थेट पैसे जमा करण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा आणखी गोंधळ उडत आहे. दरम्यान, रांगेत उभ्या असलेल्या काही नागरिकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबतही आक्षेप नोंदविले आहेत. ओळखीच्या व्यक्तींच्या पावत्या आधी जमा करून घेतल्या जात असून, त्यांना दुसऱ्या दिवशी प्राधान्याने कार्ड दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या सर्व प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना कार्डसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, याबाबत एसटी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे हे कार्ड मिळण्यासाठी जिल्ह्यातून देखील अनेक तक्रारी येत आहेत




