
पोलीस भरतीत रत्नागिरीतील स्थानिक ४५ जणांची निवड
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि चालक पदांच्या भरतीचा निकाल जाहीर होताच यंदा स्थानिक तरुणांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या निवड यादीत तब्बल ४५ स्थानिक उमेदवारांनी यश मिळवत जिल्ह्याचा दबदबा सिद्ध केला आहे. विशेष म्हणजे, बाहेरील जिल्ह्यांच्या उमेदवारांचे वर्चस्व मोडीत काढत स्थानिक मुलांनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे.
जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस शिपाई आणि ८ चालक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा तसेच चालक पदासाठी स्वतंत्र कौशल्य चाचणी अशा कठीण टप्प्यांतून उमेदवारांना जावे लागले. या सर्व टप्प्यांत उत्कृष्ट कामगिरी करत स्थानिक तरुणांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक उमेदवारांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. मुलींचाही सहभाग लक्षणीय असून, त्यांनीही या भरतीत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात स्थानिक भाषा, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक वास्तवाची जाण असलेले मनुष्यबळ वाढणार आहे. दरम्यान, जाहीर करण्यात आलेली यादी ही तात्पुरती असून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.www.konkantoday.com




