महावितरणच्या पोल उभारणीमुळे लांजा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, सभापती रफिक नेवरेकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा


लांजा : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विद्युत पोल उभारणीच्या कामामुळे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेला मोठा फटका बसत असून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर आणि पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देत महावितरण अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
सध्या मुंबई-गोवा महामार्गालगत विद्युत पोल उभारणीचे काम सुरू असून या कामादरम्यान नगरपंचायतीच्या घरगुती पाणीपुरवठा लाईन्स वारंवार फुटत आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. गळती दुरुस्त करण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्याचा रोष नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर काढला जात आहे.
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज अधिक असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अनेक ठिकाणी विद्युत पोल थेट पाणीपुरवठा पाईपलाईनवर अथवा तिच्या अगदी लगत उभारले जात असल्याने भविष्यात दुरुस्तीची कामे तसेच नवीन नळजोडणी करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता नगरपंचायतीने व्यक्त केली आहे. तसेच विद्युत पोलांच्या जवळ खोदकाम करणे धोकादायक ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या (डीपीआर) मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन टाकण्याचे व खोदकामाचे काम होणार आहे. मात्र सध्या उभारण्यात येणारे विद्युत पोल या कामात अडथळा ठरू शकतात, अशी गंभीर चिंता नगरपंचायतीने व्यक्त केली आहे.
यासंदर्भात नगरपंचायतीने महावितरणच्या लांजा व रत्नागिरी कार्यालयांशी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. २३ मार्च ते ३ जून या कालावधीत वेळोवेळी पाठविलेल्या पत्रांद्वारे पाईपलाईनवर अथवा तिच्या लगत उभारण्यात येणारे विद्युत पोल किमान दोन फूट अंतरावर हलविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नगरपंचायतीने केला आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर व पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी सांगितले की, “पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रत्येक अडचणीबाबत नागरिकांना आम्हालाच उत्तर द्यावे लागते. त्यामुळे पाईपलाईनपासून किमान दोन फूट अंतरावर विद्युत पोल उभारून पाणीपुरवठ्यात येणारे अडथळे तातडीने दूर करावेत. अन्यथा नागरिकांच्या रोषाला तुम्हालाही सामोरे जावे लागेल.”
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर, महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी, विद्युत पोल ठेकेदार कंपनीचे कर्मचारी, महामार्ग ठेकेदार कंपनीचे नरेश सितलानी, नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे राजेश लांजेकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button