
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणा-या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार
रत्नागिरी, दि. २२ ): जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य किंवा पत्नी यांना विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करण्याबद्दल विशेष गौरव पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिकांनी संबंधीत संस्था / कार्यालयाची प्रमाणपत्रे, गुणपत्रक, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र यासह २० सप्टेंबर २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २२२२७१) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, जसे खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, नृत्य वादन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त माजी सैनिक, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षमध्ये ९० टक्के व इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक/विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना, राज्य स्तरावरील कार्याबद्दल एकरकमी २५ हजार रुपये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याबद्दल ५० हजार रुपये व आयआयटी, आयआयएम व एआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना १ लाख रुपये विशेष गौरव पुरस्कार, व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.




