सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी रंगेहाथ सापडला


चिपळूण महसूल विभागातील उमेश राजेशिर्के ताब्यात; कारवाईने खळबळ


चिपळूण : सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील महसूल विभागातील मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात आवश्यक फेरफार करण्यासाठी उमेश राजेशिर्के यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई करण्याची योजना आखली.

यानुसार चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना राजेशिर्के यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महसूल विभागातील एका मंडळ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना पकडण्यात आल्याने जिल्हाभरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे महसूल विभागातही खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button