
एनसीएमसी कार्ड स्वाईपच्या तक्रारींवरून शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर आगार व्यवस्थापकांना निवेदन
ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे महिला प्रवाशांना मनस्ताप; त्रुटी दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा

राजापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून एनसीएमसी (NCMC) कार्ड वापरास अनिवार्यता करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेषतः नेटवर्कअभावी कार्ड स्वाईप होत नसल्याने तसेच कार्डचे रिचार्ज अपडेट होत नसल्याने अनेक महिला प्रवाशांना अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजापूर आगार व्यवस्थापक श्रीमती काव्या पेडणेकर यांची भेट घेऊन या समस्यांबाबत चर्चा केली तसेच निवेदन सादर केले.
एनसीएमसी कार्ड स्वाईपसंदर्भात अनेक महिला प्रवाशांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या तक्रारी मांडल्या. ग्रामीण भागात पुरेसे नेटवर्क उपलब्ध नसल्याने कार्ड स्वाईप करण्यात अडचणी येत असून, रिचार्ज करूनही त्याची नोंद तातडीने होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. परिणामी काही महिला प्रवाशांना सवलतीच्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागल्याचे सांगण्यात आले.
या तक्रारींची सत्यता जाणून घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजापूर आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी आगार व्यवस्थापनाकडून एनसीएमसी कार्ड सेवा नव्याने सुरू झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे मान्य करण्यात आले. तसेच या त्रुटींबाबत वरिष्ठ स्तरावर व जिल्हा कार्यालयाला कळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन येत्या दोन दिवसांत एनसीएमसी कार्ड स्वाईप व रिचार्जसंदर्भातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनगराध्यक्ष विनय गुरव, माजी सभापती अभिजित तेली, माजी नगरसेवक अभय मेळेकर, अनिल कुडाळी, विभागप्रमुख संतोष हातणकर, युवासेनेचे उपप्रमुख सुहास कुपले तसेच कार्यालय प्रमुख संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.




