जे. जे. रुग्णालयात आठवडाभर पुरेल इतकाच प्राणवायूचा साठा; पुरवठादाराचे १६० कोटींचे देयके थकल्याने पुरवठा बंद


मुंबई : जे. जे. रुग्णालयाला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराची मागील काही महिन्यांपासून जवळपास १६० कोटी रुपयांची देयके थकविण्यात आली आहेत. त्यामुळे पुरवठादारांनी काही दिवसांपासून प्राणवायूचा पुरवठा बंद केला आहे. परिणामी पुढील आठवडाभर पुरेल इतकाच प्राणवायूचा साठा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे पुरवठादारांची देयके तातडीने मंजूर न झाल्यास रुग्णालयातील रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात येत असतात. दररोज किमान तीन ते तीन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. तसेच १०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये दररोज होत असतात. यातील अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार होतात. त्यामुळे या रुग्णांना प्राणवायूची नितांत गरज असते. या रुग्णांसाठी आवश्यक प्राणवायू दोन पुरवठादारांकडून रुग्णालयाला पुरविण्यात येतो. या पुरवठादारांपैकी एका पुरवठादाराचे १०० कोटी तर दुसऱ्या पुरवठादाराचे ६० कोटी असे तब्बल १६० कोटी रुपयांचे देयक मागील काही महिन्यांपासून शासनाकडून थकविण्यात आली आहेत.

प्रशासकीय गोंधळात रुग्णांचा जीव टांगणीला

प्राणवायू पुरवठादाराची देयके जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहेत. मात्र शासनाकडून त्यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. देयके मंजूर होत नसल्याने पुरवठादारांकडून रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार विचारणा करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून देयके मंजूर होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना काहीच उत्तर दिले जात नाही. कोट्यवधी रुपयांची देयके थकलेले असल्याने पुरवठादारांना व्यवसाय करणे अवघड होत आहे. त्यामुळे पुरवठादारांनी रुग्णालयाचा प्राणवायूचा पुरवठा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी सध्या रुग्णालयामध्ये असलेला प्राणवायूचा साठा हा आठवडाभर पुरेल इतकाच आहे.

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, तीव्र हृदयविकार उपचार कक्ष, बालरोग अतिदक्षता विभाग अशा विविध विभागामध्ये ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच पुढील काही दिवसांमध्ये या रुग्णांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. या रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीत न झाल्यास त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने सादर केलेली देयके मंजूर करण्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. रुग्णालयातील प्राणवायूचा साठा संपण्यापूर्वी त्याचा पुरवठा न झाल्यास अनेक रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता रुग्णालयातील सूत्रांनी दिली. या संदर्भात जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अधिष्ठात्यांना ४० लाखांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार

राज्य सरकारच्या आदेशानुसार अधिष्ठाता यांना ४० लाख रुपयांपर्यंतची देयके मंजूर करण्याचे आदेश आहेत. यामध्ये रुग्णालयातील औषधांपासून अन्य सर्व बाबींचा समावेश असतो. त्यामुळे मोठ्या रकमेची देयके ही मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावी लागतात. मात्र देयके मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button