कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; पुणे घाट विभागाला ‘रेड अलर्ट’


मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः घाट परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या बंगालच्या उपसागरालगत सक्रिय असलेली चक्रीय वाऱ्यांची प्रणाली आणि दक्षिण गुजरातपर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाट विभाग आणि नाशिक घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर पुणे घाट विभागाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

याशिवाय सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा उर्वरित भाग, नाशिक तसेच संपूर्ण विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, गुरुवारपर्यंत राज्यातील काही भागांत पावसाचा प्रभाव कायम राहील. त्यानंतर शुक्रवार आणि शनिवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button