
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीराजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार
वसई, दि. ३१ : पर्यावरण संवर्धन, रक्तदान, देहदान-अवयवदान, अपघातग्रस्तांना मदत यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेले कार्य हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार तथा एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी काढले.
वसई_विरार पूर्वेतील शिरसाड येथे रविवारी वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राजीव खांडेकर उपस्थित होते.
यावेळी हजारो भाविकांना संबोधित करताना त्यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.
“मरणोत्तर देहदान आणि अवयवदानाचे कार्य आजवर कोणत्याही संतांनी केले नाही. हे कार्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी करत आहेत,” असे राजीव खांडेकर यांनी नमूद केले. समाजात सध्या नकारात्मकता वाढत असताना वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी सकारात्मकतेचे बीज रुजवत आहेत”
शिरसाड येथील उपपीठावर साकारण्यात आलेल्या श्री लड्डू गोपाल आणि यशोदा माता मंदिराच्या वास्तुकलेचेही श्री खांडेकर यांनी कौतुक केले. लाकडावर साकारलेली दुर्मिळ आणि सुंदर कोरीव कला अनेक वर्षांनंतर येथे अनुभवता आली. आगामी काळात हे मंदिर मोठे तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी यांच्यासमवेत त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. भाविकांची श्रद्धा, शिस्त आणि सेवाभाव पाहून आपण भारावून गेल्याचेही त्यांनी सांगितले.
अवघ्या १५ दिवसांत ६ लाख १६ हजार ९ वृक्षांचे रोपण
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. अवघ्या १५ दिवसांत महाराष्ट्रासह देशभरात ६ लाख १६ हजार ९ वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘प्रत्येक भक्त एक वृक्ष’ या संकल्पनेतून ७ ते १९ जून २०२६ या कालावधीत ही व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
या संकल्पपूर्ती सोहळ्यात पुढील वर्षी ११ लाख वृक्षांची लागवड करून ते जगवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.
या मोहिमेत मराठवाडा उपपीठाने १ लाख ६८ हजार ८८३ वृक्षांची लागवड करून प्रथम क्रमांक मिळवला. पश्चिम महाराष्ट्र क्षेत्राने १ लाख ९ हजार १८३, तर उत्तर महाराष्ट्र उपपीठाने ८२ हजार ६७२ वृक्षांची लागवड केली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पीठे, जिल्हे, तालुके आणि वृक्षमित्रांचा यावेळी गौरव करण्यात आला. उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे, नाशिक यांचा समावेश आहे तर. उत्कृष्ट तालुक्यांमध्ये मुखेड, पर्वती आणि सिल्लोड यांचा गौरव करण्यात आला.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यावेळी म्हणाले,”प्रशासनाकडे साधने आहेत; आमच्याकडे लाखो हात आहेत. पुढील वर्षी ११ लाख वृक्ष लावून ते जगवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. हिरवीगार वसुंधरा हेच आमचे ध्येय आहे.”सर्व मान्यवरांनी जगद्गुरूंच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले,
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत सावरा, आमदार राजन नाईक, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर आजीव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा बोडेकर यांनी केले.



