कलंडणारी गणेशमूर्ती मुस्लिम बांधवानी सावरली, मुंब्र्यात भुलेश्वरची पुनरावृत्ती टळली!

Muslim youths who are steadying the Ganesh idol are being praised : वाजतगाजत मोठ्या उत्साहात भिवंडीच्या दिशेने ट्रॉलीतून गणेशमूर्ती रविवारी रात्री घेऊन जात असताना अचानक ट्रॉलीचे चाक तुटले आणि काहीसा गोंधळ उडाला. पण त्याचवेळी मुस्लिम बांधव तत्काळ धावून आले व त्यांनी कलंडणारी गणेशमूर्ती लगेच सावरून धरली. त्यामुळे भुलेश्वरची पुनरावृत्ती टळली आहे. या घटनेमुळे हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सलोख्याचा संदेश देण्यात आला असून गणेशमूर्ती सावरणाऱ्या मुस्लिम तरुणांचे कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील भुलेश्वर भागात ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फूट उंच गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान मूर्ती कोसळून दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मुंब्यातील शंकर मंदिर परिसरात तयार करण्यात आलेली सुमारे २० फूट उंचीची गणेशमूर्ती भिवंडीच्या पद्मानगरच्या दिशेने रविवारी रात्री निघाली होती. दाभोळकर नाक्यावर रात्री १२ च्या सुमारास ट्रॉली आली असता एक चाक अचानक तुटले. त्यामुळे गणेशमूर्तीला हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. मूर्ती काहीशी कलंडलीदेखील पण त्याचवेळी आरिफ सय्यद उर्फ पापा, बासीत शेख आणि शाहू या तिघांनी अनेक मुस्लिम तरुणांना बोलावून ही ट्रॉली कलंडणार नाही, याची काळजी घेत एका बाजूने सावरली.

श्रीफळ वाढवला

ट्रॉलीचा झालेला प्रकार पुन्हा घडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी क्रेन बोलावून गणेशमूर्ती खाली उतरवली तसेच नवीन ट्रॉली आल्यानंतर गणेशमूर्ती त्यावर ठेवली. पहाटे चार वाजेच्या सुमारास भिवंडीच्या दिशेने ही ट्रॉली रवाना केली. पुढे कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मुस्लिम बांधवानी रस्त्यावर श्रीफळ वाढवले. रात्रभर घेतलेल्या परिश्रमाबद्दल मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाने मुंब्यातील मुस्लिम बांधवांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button