
रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित?
उर्दू, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके न मिळाल्याच्या तक्रारी
रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचा तुटवडा जाणवत असून, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचे पालक व शिक्षकांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वरसह विविध तालुक्यांतून तक्रारी येत आहेत. यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने नव्या पुस्तकांची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून १०० टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याने पुस्तके नेमकी कुठे अडकली, याची चौकशी करून विद्यार्थ्यांना तातडीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पालक, शिक्षक आणि शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.




