
४ दिवस चिखलाखाली दबलेली ७ वर्षांची ‘शिरगंगा’ जिवंत
नेपाळमध्ये जलप्रलयाने घडवलेल्या भीषण विध्वंसाला चार दिवस उलटले असतानाच शनिवारी बचाव पथकाला चमत्काराची अनुभूती आली. रसुवा जिल्ह्यातील गोसाईकुंड ग्रामीण नगरपालिका २ मधील तिमुरे येथे चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली सात वर्षांची शिरगंगा इचै मगर ही मुलगी जिवंत आढळली.तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देत राहिलेल्या या चिमुकलीला सशस्त्र पोलिस दलाच्या धुन्चे येथील कंपनी क्रमांक २०च्या पथकाने बाहेर काढले. तिच्या अंगावर चिखलाचा थर होता आणि ती जखमी अवस्थेत होती.
बचावानंतर शिरगंगाला तातडीने हेलिकॉप्टरने धुन्चे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी काठमांडूतील टीयू टीचिंग हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. या चिमुकलीच्या आई, वडिलांनाही याच महापुरातून यापूर्वीच वाचवण्यात आले होते. ग्लोबल आयएमई बँकेच्या तिमुरे शाखेत कार्यरत असलेले गीता इचाईमागर आणि लोकबहादूर इचाईमागर यांना बचाव करून उपचारासाठी काठमांडूला हलवण्यात आले होते. त्यामुळे चार दिवसांनंतर मुलगी जिवंत सापडल्याची बातमी तिच्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरली.




