गोळप-मानेवाडी दरडग्रस्त नागरिक ५ वर्षांनंतरही मदतीपासून वंचित; ठाकरे युवासेनेचा आक्रमक पवित्रा, प्रसाद सावंत यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी तालुक्यातील मौजे गोळप-मानेवाडी येथे सन २०२१ मध्ये झालेल्या भीषण भूस्खलनाला (दरड कोसळणे) पाच वर्षे उलटून गेली, तरीही येथील आपत्तीग्रस्तांना अद्याप कोणतीही ठोस शासकीय मदत किंवा कायमस्वरूपी पुनर्वसन मिळालेले नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात ‘युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला असून, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांसाठी निवेदन सादर करण्यात आले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांनी नुकताच गोळप-मानेवाडी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात पाच वर्षानंतरही येथील नागरिकांची परिस्थिती तशीच असून, ग्रामस्थ आजही दरवर्षी पावसाळ्यात आर्थिक विवंचनेत आणि भीतीच्या छायेखाली जगत असल्याचे समोर आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात युवासेनेने प्रामुख्याने पुढील मागण्या लावून धरल्या आहेत:
प्रलंबित मदत वाटप: पंचनामे होऊनही तांत्रिक कारणांमुळे अडकलेली मदत बाधितांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी.
कायमस्वरूपी पुनर्वसन: भूस्खलन प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या कुटुंबांचे उपाययोजना करेपर्यंत तातडीने सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे.
संरक्षक भिंत: येणारा पावसाळा पाहता भविष्यातील धोका टाळण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी तात्काळ सुरक्षा भिंत उभारण्यात यावी. सध्या ही बाब शक्य नसली तरी भविष्यात ह्याची तरतूद करावी. २०२१ ची ती घटना अत्यंत गंभीर होती. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे येथील नागरिकांचे जीवन टांगणीला लागले आहे. प्रशासनाने या संवेदनशील विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी केली आहे.या पाहणी दौऱ्यात आणि निवेदन सादरीकरणाच्या वेळी तालुक्यातील युवासेनेचे उपतालुका प्रमुख रितेश लोखंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button