
ना कोणाला घाबरणार, ना मागे हटणार’; कायदेशीर लढा सुरूच ठेवणार – अभिजीत दीपकेंचा निर्धार
नवी दिल्ली :- बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धते सारख्या कारवायांना सामोरे जावे लागले, तरी आपला लढा थांबवणार नसल्याचा ठाम निर्धार कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपके यांनी, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची आज सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली. कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी ते वकील वृंदा ग्रोव्हर यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
“सौरव आणि आशु आल्यावर आम्ही एकत्र येऊ, पुन्हा रणनीती आखू आणि पुढे कसे जायचे, हे ठरवू. गेल्या काही दिवसांत बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धतेसारख्या घटना पाहायला मिळाल्या. यावरून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, आम्ही ना कोणाला घाबरणार आणि ना मागे हटणार. हा एक लांब लढा आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत,” असे दीपके यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील कॉनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये प्रस्तावित ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी, ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी, त्यांना अटींसह जामीन मंजूर करण्यात आला. मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातून त्यांची सुटका करण्यात आली. शांतता भंग न करण्याबाबतच्या बंधपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या घडामोडींनंतरही कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याची भूमिका दीपके यांनी कायम ठेवली आहे.




