महावितरणच्या राजापूर भाग-१ मध्ये तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती; कामकाजाला मिळणार गती


राजापूर : महावितरणच्या राजापूर भाग-१ विभागातील तीन रिक्त पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील प्रशासकीय व तांत्रिक कामकाजाला अधिक गती मिळण्याबरोबरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
राजापूर शहर शाखेच्या सहाय्यक अभियंता प्राजक्ता माळवे यांची रत्नागिरी विभागात बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर निलेश पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता माळवे यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला होता. विशेषतः मान्सूनच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या गंभीर वीज समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून त्यांनी ग्राहकांना दिलासा दिला होता.
दरम्यान, महावितरणच्या राजापूर भाग-१ अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेल्या सहाय्यक अभियंता (गुणनियंत्रण) पदावर पांडुरंग कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे वीज मीटर रीडिंग, तपासणी तसेच अन्य तांत्रिक कामकाजाला आता गती मिळणार आहे.
तसेच राजापूर ग्रामीण शाखा कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता पदावर संतोष शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील सहाय्यक अभियंता दगडू पांडाव सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्यांच्या रिक्त जागी शेळके यांची नियुक्ती झाली आहे.
महावितरणच्या राजापूर भाग-१ अंतर्गत अधिकारी वर्गातील सर्व रिक्त पदे आता भरली गेल्याने विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारी व वीजविषयक समस्या सोडविण्यासाठीही अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.
“महावितरणकडून ग्राहकांना अधिक चांगली व तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही महावितरण राजापूर भाग-१ चे उपकार्यकारी अभियंता जमीर तांबोळी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button