
‘अभंग रंग’मध्ये भरतनाट्यमच्या नृत्याविष्कारातून भक्तिरंगाची अनुभूती

रत्नागिरी : नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने सौ प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग रंग’ या विशेष कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती आणि भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचा सुंदर आविष्कार सादर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक श्री. अमित वसंत विलणकर, प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. निवेदिता निकेश कळंबटे, पत्रकार सौ. कोमल कळंबटे, फाटक हायस्कूलच्या शिक्षिका सौ. प्रियंका मुरुडकर तसेच कार्यक्रमाच्या आयोजिका व गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या मातोश्री श्रीमती सुप्रिया तोडणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रंगदेवतेला पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात भरतनाट्यमच्या माध्यमातून विविध अभंग व भक्तिरचनांवर आधारित अनेक नृत्याविष्कार सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या नृत्यकौशल्यातून भक्तिभाव, भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय नृत्यपरंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या नृत्याविष्कारांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक अमित वसंत विलणकर आणि नगरसेविका सौ. निवेदिता निकेश कळंबटे यांनी उपस्थित कलाकार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा योगेश मगदूम यांनी केले.
‘एक अभंग… अनेक भावना… एकच भक्तिरंग!’ या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना भक्ती, भरतनाट्यम आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर अनुभव दिला.




