
चिमुकल्यांच्या ‘दुडू दुडू’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
११ गटांतून ११ विजेत्यांची निवड; सहभागी सर्वच चिमुकल्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव

चिपळूण : रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दुडू दुडू– रांगणाऱ्या आणि चालणाऱ्या चिमुकल्यांची शर्यत’ या अभिनव स्पर्धेला चिमुकले, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, १६ ऑगस्ट रोजी बाळशास्त्री सभागृह, लोकमान्य स्मारक वाचन मंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
चिमुकल्यांच्या निरागस हालचाली आणि पालकांच्या जल्लोषामुळे सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेसाठी एकूण ११ गट करण्यात आले होते. प्रत्येक गटातून एका विजेत्याची निवड करण्यात आली. विजेत्या ११ चिमुकल्यांना पदक देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, या स्पर्धेत ‘हार-जीत नसते, प्रत्येक चिमुकला हा आपलाच विजेता असतो’ या भावनेला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच चिमुकल्यांना भेटवस्तू आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाला रोटरी-रोटरॅक्ट परिवारातील मान्यवरांसह २०० हून अधिक पालक व नागरिक उपस्थित होते. पालकांकडून चिमुकल्यांना मिळणारे प्रोत्साहन आणि सभागृहातील जल्लोष हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.
लहान मुलांसाठी नेहमीच्या स्पर्धांपेक्षा वेगळा, आनंददायी आणि पालकांसाठीही अविस्मरणीय अनुभव देणारा उपक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूणने ही स्पर्धा आयोजित केली होती.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सिद्धेश जाधव, सचिव मृणाल करंजकर, खजिनदार यश आंबुर्ले यांच्यासह दिक्षा देवळेकर, आकाश रेडिज, ओंकार ओतारी, आकांक्षा गुरव, अजिंक्य चिटणीस, अभिषेक कदम आणि पलाश लाड यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना रेडिज यांनी केले.




