
राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आगचालत्या दुचाकीचे आगीत मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही
राजापूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सचिन रहाटे यांच्या चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रहाटे हे सकाळी सात वाजताच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत कोंडेतड येथे पाणीपुरवठ्याची लाइन सोडण्याच्या कामासाठी दुचाकीवरून जात होते. याचदरम्यान त्यांच्या चालत्या दुचाकीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आग विझविण्यासाठी राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्यास सहकार्य केले. यावेळी नगरपरिषदेचे वाहनचालक दिलीप तांबे, भूपेश कनेरी, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव, साईकिरण कोठारकर, संदीप कुळी, प्रवीण शिंदे, निलेश बाणे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने सचिन रहाटे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.





