चिपळूण तालुकाही दुष्काळग्रस्त जाहीर करा!

कृषीवसंत शेतकरी संघाची शासनाकडे मागणी; भात उत्पादनासह फळबागांनाही फटका

चिपळूण : पावसाचे कमी प्रमाण आणि अनियमित पावसामुळे चिपळूण तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये अपेक्षित दाणे भरले नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकटही गडद होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने चिपळूण तालुकाही दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कृषीवसंत शेतकरी संघाच्या सभेत करण्यात आली.

चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित या सभेत शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान आणि संभाव्य पाणीटंचाई यावर चर्चा झाली. शेतांमध्ये हिरवळ दिसत असली तरी भाताच्या लोंब्यांमध्ये दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान लक्षात न घेता केवळ पिकांची स्थिती पाहून शेती चांगली असल्याचे चित्र निर्माण होऊ नये, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. आंबा, काजू आणि नारळाच्या बागांनाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर झाल्यास तिचा लाभ प्रत्यक्ष शेती करणाऱ्या कुळांनाही मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकरी महिलांच्या नोंदणी प्रक्रियेत शहर परिसरातील महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांनाही योजनांचा लाभ द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी बचत गटांच्या माध्यमातून मूल्यवर्धित पिकांच्या योजना राबविण्याचे आवाहन केले. आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावोगावी नद्या, नाले आणि ओढ्यांवर छोटे बंधारे उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी शासनाच्या सहकार्याबरोबरच लोकसहभाग आणि शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

या सभेला कृषीवसंत शेतकरी संघाचे अध्यक्ष कृषीभूषण अनंतराव खांबे, शंकरराव जाधव, मनोहर महाडीक, दिनेश दळवी, नागेश बोंडकर, डॉ. रत्नाकर थत्ते, बापू काणे, संतोष तांदळे, प्रकाश नाना कांबळे, विलास डिके, कैसर देसाई, संजयराव आंब्रे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. दसऱ्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनंतराव खांबे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button