सहकारी संस्था केवळ वित्तपुरवठादार नव्हे, तर ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र बनाव्यात – दीपक पटवर्धन


प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या व्यावसायिक विकासावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडले सहकार क्षेत्राच्या बहुआयामी विकासाचे महत्त्व*


रत्नागिरी : सहकारी संस्था या केवळ वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासात त्यांचा बहुआयामी सहभाग महत्त्वाचा आहे. बदलते तंत्रज्ञान, बाजारपेठेतील स्पर्धा आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीचा स्वीकार करून प्राथमिक कृषी पतसंस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. यातूनच सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन दीपक पटवर्धन यांनी केले.

पुणे येथील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (PACS) व्यावसायिक विकासविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, झांबिया, गॅम्बिया आणि भारतातील निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते.

ग्रामीण अर्थकारणाचा कणा म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था

प्राथमिक कृषी पतसंस्था आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र, बदलत्या काळात केवळ पारंपरिक पद्धतीने काम करून चालणार नाही. संस्थांनी आपल्या कामकाजाचा विस्तार करून विविध क्षेत्रांत योगदान देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानातील बदल, बाजारपेठेतील चढाओढ आणि वाढती स्पर्धा यांचा विचार करून सहकारी संस्थांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. बदल स्वीकारून पुढे जाण्यातच सहकार क्षेत्राच्या यशाचे रहस्य दडले आहे, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार विकासाचा आदर्श

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेताना त्यांनी विविध सहकारी संस्थांच्या एकत्रित विकासातून निर्माण झालेल्या आर्थिक प्रगतीची उदाहरणे दिली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक गती निर्माण झाली असून स्थानिक विकासालाही चालना मिळाली आहे. या प्रक्रियेत प्राथमिक कृषी पतसंस्थांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना माहिती दिली.

यावेळी स्वरूपानंद पतसंस्थेने भांडवलनिर्मितीच्या क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी आणि संस्थेच्या प्रगतीचा प्रवास त्यांनी उलगडला. तसेच संस्थेची अनुत्पादित मालमत्ता (NPA) ६३ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि त्यातून मिळालेले यश याबाबतही त्यांनी सविस्तर विवेचन केले.

‘सहकारातून समृद्धी’साठी युवा सहभाग आवश्यक

पंतप्रधानांनी मांडलेला ‘सहकारातून समृद्धी’ हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकारी संस्थांनी काळानुरूप बदल स्वीकारणे आणि तरुण पिढीचा सक्रिय सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, व्यावसायिक दृष्टिकोन आणि नव्या संधींचा शोध यांना प्राधान्य दिल्यास संस्थांची कार्यक्षमता वाढू शकते, असेही त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.

३५ वर्षांच्या वाटचालीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

आंतरराष्ट्रीय परिषदेत सहकारी संस्थांच्या यशोगाथा मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पटवर्धन म्हणाले की, विविध देशांतील प्रतिनिधींसमोर सहकार क्षेत्रातील अनुभव मांडता आले आणि त्यांच्या प्रश्नांचे निरसन करता आले, हा आनंदाचा क्षण आहे. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वक्ता म्हणून सहभागी होण्याची संधी म्हणजे सहकार क्षेत्रातील आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी वाटचालीची पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकारी संस्थांनी पारंपरिक कार्यपद्धतीच्या पलीकडे जाऊन बहुआयामी विकासाचा मार्ग स्वीकारावा, हा संदेश या परिषदेतून अधोरेखित झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button