
वाशिष्ठी खाडीतील गाळ उपशासाठी २२ ऑक्टोबरला उच्चस्तरीय बैठक
आमदार शेखर निकम यांच्या मागणीची दखल; चिपळूणच्या पूरप्रश्नावर तोडगा निघण्याची अपेक्षा
चिपळूण : चिपळूणच्या पूरसमस्येच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांनी बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेण्यात आली असून, २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
२०२१ मधील महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले; मात्र गोवळकोटच्या पुढील भागातील नदीपात्र सीआरझेड क्षेत्रात आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने गाळ उपशाचे काम रखडले आहे. या भागातील गाळामुळे नदीच्या प्रवाहावर परिणाम होत असल्याने पूरस्थितीचा धोका कायम आहे.
मुंबईतील मंत्रिमंडळाच्या दालन क्रमांक २ मध्ये दुपारी १ वाजता होणाऱ्या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत प्रशासकीय अडथळ्यांवर तोडगा निघून गाळ उपशाला मार्ग मोकळा होणार का, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.




