
निवळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट होणार!
जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांची पाहणी; नवीन सुसज्ज इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटांतर्गत निवळी येथील अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. जुन्या इमारतीच्या निर्लेखनाची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर नवीन सुसज्ज इमारत उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
निवळी आणि परिसरातील शेतकरी व पशुपालकांसाठी हा दवाखाना महत्त्वाचा आहे. मात्र, सध्याच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने पशुधनाच्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन नवीन इमारतीच्या उभारणीसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे सभापती महेश नाटेकर यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देत हे काम प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही नाटेकर यांनी दिली. वहाळ जिल्हा परिषद गटातील जनतेने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवळी येथील दवाखान्याच्या प्रश्नासाठी शिवानी सावंत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन सुसज्ज इमारत उभारल्यानंतर निवळी आणि परिसरातील पशुपालकांना पशुधनाच्या उपचारांसाठी अधिक चांगल्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा मिळण्यासोबतच परिसरातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या पाहणीवेळी संदीप सावंत, सहाय्यक आयुक्त सोनावणे, नाना सुर्वे, भरत बल्लाळ, विजय भुवड, महेश डिके, संजय ऊर्फ बावा भागडे, संदीप भागडे, सुरेश कांबळे, प्रशांत सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




