
हॅपी मेडिकेअर सेंटरच्या वतीने पावस येथील कै.ती.सौ.अनसुया – आनंदी वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
रत्नागिरी : श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पावनभूमीत म्हणजेच पावस येथे असलेल्या कै.ती.सौ.अनसुया – आनंदी वृद्धाश्रमाला गुरुवार दि. ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील मारुतीमंदिर येथील हॅपी मेडिकेअर सेंटरच्या वतीने सदिच्छा भेट देऊन फळवाटप आणि खाऊवाटप करण्यात आले. ही सदिच्छा भेट सेंटरचे व्यवस्थापक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी सुमारे ७० नागरिक उपस्थित होते.
वृद्धाश्रमात १० वृद्ध महिला राहात आहेत. या वृद्धाश्रमात वृद्ध महिलांसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण फक्त सुखसुविधा मिळाल्या की जीवन सफल होत नाही. हॅपी मेडिकेअर सेंटरच्या गाड्या आवारात लागल्या तेव्हा या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची ख़ुशी दिसून आली. रक्ताच्या नात्यांनी एकाकी जीवन जगायला सोडलं, पण आमच्यासाठी कोणीतरी आपुलकीने आपली चौकशी करायला येतंय ही भावनाच त्यांच्यासाठी मोठी होती. तिथे या वृद्धाश्रमातील महिलांची देखभाल व्यवस्थापिका चेतना खातू यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिला करतात.
हॅपी मेडिकेअर सेंटरमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यावेळी जमा होणाऱ्या वर्गणीतून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत दरवर्षी वेगवेगळ्या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये जाऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांना मदत केली जाते. गुरुवार दि. ८ ऑक्टोबर रोजी हॅपी मेडिकेअर सेंटरच्या वतीने सुमारे ७० जणांनी सदिच्छा भेट देऊन फळवाटप, खाऊवाटप केले. तसेच सेंटरच्या वतीने रोख रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली. यावेळी गेलेल्या मंडळींपैकी अनेकांनी वैयक्तिक स्वरूपातही देणगी दिली.




