अभिजित दीपके यांना आरपीआयमध्ये येण्याची रामदास आठवलेंची खुली ऑफर

दीपके यांची भूमिका योग्य; अटी-शर्तींवर पक्षात प्रवेश देऊ: रामदास आठवले


सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी नेते अभिजित दीपके यांनी विविध प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच दीपके यांनी आपल्या आरपीआय पक्षात यावे, अशी खुली ऑफरही आठवले यांनी दिली.

चिपळूण दौऱ्यावर आले असताना रामदास आठवले यांनी दीपके यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. मात्र जंतर-मंतरवरील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने व्हायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दीपके यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केल्यानंतरही आंदोलन करता येईल का, याबाबत विचारले असता आठवले यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “अटी आणि शर्तींवर अभिजित दीपके यांना पक्षात प्रवेश देऊ,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी आठवले यांनी दलित समाजातील तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले. तरुणांनी शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रगती साधावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोकणच्या विकासाबाबत बोलताना कोकणचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली. कोकणातील पर्यटनाला चालना मिळाल्यास स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button