आंबा घाटाच्या दुरुस्तीचा आराखडा आठवडाभरात; अहवालानंतर कामाला सुरुवात! अवघड वाहनांना प्रतीक्षाच


रत्नागिरी : पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्ता खचल्याने आणि वरच्या भागात गंभीर भेगा पडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पुण्यातील तज्ज्ञ एजन्सीने घाटाची पाहणी करून मातीचे नमुने घेतले असून, संरक्षक भिंत कशा पद्धतीने उभारावी किंवा अन्य कोणता पर्याय योग्य ठरेल, याचा अहवाल आठवडाभरात देण्यात येणार आहे. या अहवालानंतर दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

आंबा घाटातील रस्ता खचलेल्या ठिकाणी सुमारे १०० मीटर खोल दरी आहे. त्यामुळे अचानक रस्ता खचल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी १२ ऑगस्टपासून आंबा घाटातून एसटी, प्रवासी बसेस तसेच सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

यापूर्वी रस्त्याला संरक्षण मिळावे यासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत खचल्याने वरचा भागही घसरला आहे. आता संरक्षक भिंत असलेल्या रस्त्याच्या भागातही भेगा पडल्या आहेत. पावसाचे पाणी भेगांमध्ये जाऊन हा भाग पुन्हा खचू नये, यासाठी सध्या तो भाग ताडपत्रीने झाकण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीने पुण्यातील तज्ज्ञ एजन्सीला या परिसराच्या अभ्यासासाठी पाचारण केले होते. एजन्सीने खचलेल्या भागाची सविस्तर पाहणी करून मातीचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांच्या अभ्यासातून भविष्यात रस्ता पुन्हा खचू नये यासाठी कोणत्या प्रकारची संरक्षक भिंत उभारावी, तिचा आराखडा कसा असावा किंवा अन्य कोणता तांत्रिक पर्याय वापरता येईल, याबाबत शिफारस केली जाणार आहे.

एजन्सीचा अहवाल आठवडाभरात प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदार कंपनीने दिली आहे. त्यामुळे आंबा घाटातील धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता तज्ज्ञांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button