
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे उपोषण; लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही
खेड : खेड रेल्वे स्टेशन फाटा ते अलसुरे, कोंडवली मार्गे शिवबोरज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी खेड पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केले.
या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्ती व देखभालीचा खर्चही वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उपोषणाची माहिती मिळताच पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चर्चेतून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी आपली भूमिका कायम ठेवली.
यावेळी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. यापूर्वीही रस्ता दुरुस्तीबाबत आश्वासने देण्यात आली होती; मात्र त्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आता केवळ तोंडी आश्वासनांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
रस्ता दुरुस्तीबाबतच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच लेखी आश्वासन न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आणि ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लेखी आश्वासन देऊन या आंदोलनावर तोडगा काढतात का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. रस्त्याची दुरवस्था आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




