
जेन झी, जेन अल्फा पिढीवर दर्जेदार चित्रपटांचे संस्कार, रत्नागिरी फिल्म सोसायटीच्या पदाधिकार्यांची माहिती
आता जेन झी’ आणि जेन अल्फा’ या तरुण पिढीला महाराष्ट्रभर दर्जेदार चित्रपटांचे संस्कार दिले जाणार आहेत. १५ ऑगस्टपासून या विशेष अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज पश्चिम विभागाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार याबाबतची सविस्तर माहिती फेडरेशनचे सचिव सुधीर मुळ्ये आणि रत्नागिरी फिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल हे फेडरेशनचे अखिल भारतीय अध्यक्ष असतानाच या कल्पनेचा विचार पुढे आला होता. मात्र, कोरोना काळामुळे हा विषय काही काळ मागे पडला होता, जो आता नव्या निर्धारपूर्वक पुढे नेण्यात येणार आहे. तसेच, पुढील महिन्यात कोलकाता येथे होणार्या अखिल भारतीय बैठकीत हा मुद्दा आग्रहाने मांडून हा उपक्रम संपूर्ण देशभर पोहोचवण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले जाणार आहेत.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन व्यवस्थापन आणि प्राचार्यांच्या परवानगीने कॅम्पस फिल्म क्लब स्थापन करण्यात येणार असून, राज्यातील सर्व विद्यापीठानी पात सहभाग घ्यावा यानाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आधीच फिल्म क्लब स्थापन करण्यास मान्यता दिली असून, लवकरच यासंदर्भातील पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पाच फिल्म क्लब स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प याद्वारे करण्यात आला आहे.




