
वाशिष्ठी नदीत मृत मगर वाहून गेल्याने खळबळ
औद्योगिक वसाहतीच्या पंपगृह परिसरातून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याचा अंदाज; छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित
चिपळूण : प्रतिनिधी : चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या पात्रात मंगळवारी सकाळी मृत मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. औद्योगिक वसाहतीच्या पंपगृह परिसरातून ही मगर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर मगरीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले.
मंगळवारी सकाळच्या सुमारास वाशिष्ठी नदीच्या पात्रातून एक मगर मृतावस्थेत वाहत जात असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मगर प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची छायाचित्रे आणि माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर नदीकाठच्या परिसरात चर्चेला उधाण आले.
दरम्यान, या घटनेबाबत वनविभागाला अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मगर नेमक्या कोणत्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली, तिचा मृत्यू कशामुळे झाला आणि ती कोणत्या ठिकाणाहून वाहत आली, याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही.
वाशिष्ठी नदीच्या पात्रात मगरींचा अधिवास असल्याने नदीकाठच्या नागरिकांकडून या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. मृत मगर पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेल्याने तिचा मृतदेह नदीच्या कोणत्या भागात आढळतो, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्राच्या आधारे वनविभागापर्यंत या घटनेची माहिती पोहोचण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने नदीपात्रात पाहणी करून मृत मगरीचा शोध घ्यावा तसेच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेमुळे वाशिष्ठी नदीतील जलचरांच्या सुरक्षेसह नदीपात्रातील पर्यावरणीय स्थितीचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.




