देवगडमध्ये शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूकडिजिटल अरेस्टची भीती दाखविली


डिजिटल अटकची भीती दाखवून गिर्ये परिसरातील एका शिक्षिकेची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.पोलीस, सायबर गुन्हे शाखा असल्याचे भासवून संशयिताने (Devgad) शिक्षिकेला अटक वॉरंट व कारावासाची भीती दाखवली. या प्रकरणी विजयदुर्ग पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता संशयिताने शिक्षिकेला फोन करून, मोबाईलवर केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अश्लील संकेतस्थळांना भेट दिल्याचा आरोप केला. तसेच मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगितले. एक लाख रुपये दंड आणि वर्षभर कारावासाची भीतीही दाखवण्यात आलो. त्यानंतर व्हाहॉट्सअॅपवर अश्लील छायाचित्रे पाठवून बदनामीची धमकी देण्यात आली.आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने शिक्षिकेने फोन कट केला. तातडीने सायबर हेल्पलाईनवर तक्रार करून बँक खाते गोठवले आणि विजयदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक दत्ता भोसले व पोलिस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.

पोलिस गणवेशातील व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून शिक्षिकेला घाबरवले, वरिष्ठांशी बोलून माफीनामा तयार करून देतो, असे सांगत एक लाख रुपयांच्या दंडापैकी २५ टक्के रक्कम भरल्यास वॉरंट रद्द करण्याचे आमिष दाखवले. घाबरलेल्या शिक्षिकेने संशयिताने दिलेल्या खात्यावर दोन वेळा १२ हजार ५०० रुपये, असे एकूण २५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर माफीनाम्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे दोन मुद्रांक आवश्यक असल्याचे सांगून आणखी ७० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.पोलिस अधिकारी, सीबीआय, सायबर गुन्हे शाखा किंवा बैंक अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.
अटक किंवा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून पैसे मागितल्यास नक्कम पाठवू नये. ओटीपी, यूपीआय पिन, बैंक खात्याची अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये. फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन विजयदुर्ग पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button