
तीन शिक्षक एकाच दिवशी प्रशासकीय कामासाठी गेल्याने शाळा बंद राहण्याची नामुष्की
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-कुड्याचा माचा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. तीन शिक्षकांची मंजूर पदे असलेल्या या शाळेतील तिन्ही शिक्षक एकाच दिवशी वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी बाहेर गेल्याने शाळेत एकही शिक्षक उपस्थित नव्हता. त्यामुळे भर पावसात चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात ताटकळत राहाण्याची वेळ आली.
शाळेतील एका शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. दुसरा शिक्षक प्रतिनियुक्तीवर होता, तर तिसरा शिक्षक शासकीय सूचनेनुसार ग्रामसभेला उपस्थित राहिला. त्यामुळे शाळेतील अध्यापनाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले. सकाळच्या सत्रात शाळेत येण्यासाठी दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकच उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय झाली. काही विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात थांबावे लागले, तर काहींना निराश होऊन घरी परतावे लागले.




