
कोकण विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली जुईकर यांचा अपक्ष अर्ज
रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, रायगड जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली जुईकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवारी (३० मे) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आपला अर्ज सादर केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जुईकर यांनी काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास आपण उमेदवारी मागे घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जुईली जुईकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या राजकारणाबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, निवडणुकीतील समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




