
आफ्रोह रत्नागिरीतर्फे निवळी येथे कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : ऑफ्रोह व महिला आघाडी रत्नागिरीच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त निवळी (रत्नागिरी) येथे ऑफ्रोह रत्नागिरीची मासिक सभा, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ऑफ्रोहचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, उपाध्यक्षा नंदा राणे, कार्याध्यक्ष बापुराव रोडे, सचिव हेमराज सोनकुसरे, ऑफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा पारशे, ऑफ्रोह’ चे प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर, सेवानिवृत्त सत्कारमूर्ती अरुण बावीस्कर, विलासराव घावट, प्रमिला घावट, कोषाध्यक्ष सतीश घावट, महिला आघाडी कार्याध्यक्ष राजकन्या भांडे, सचिव स्वाती रोडे, सहसचिव प्रतिभा रोडे व ऑफ्रोहचे सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसिद्धीप्रमुख श्री. पौनीकर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘अनुसूचित जाती, अनु.जमाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कायदा २००० मध्ये सुधारणा करण्याची गरजच काय होती? अगोदरच ‘कायदा २०००’ हा अन्यायग्रस्त आदिवासींवर “आघात’ करणारा कायदा आहेच. त्यात आणखी भर घालून केवळ महाराष्ट्रातल्या ३३ अन्यायग्रस्त आदिवासींमध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी व उच्च न्यायालयाने लाखो रुपयांचा दंड बसवलेल्या व वाभाडे काढलेल्या समितीच्या अधिकाऱ्यांच्या ‘मनमानी व भ्रष्टाचारी’ कारभाराला खतपाणी घालण्यासाठी कायदा २००० च्या सुधारणा २०२६ या कायद्याने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून तर केला नाही ना?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर रोडे यांनी ऑफ्रोह संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा व पुढील दिशा यावर मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष नंदा राणे यांनी ऑफ्रोहच्या एकजुटीमुळे अधिसंख्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला, असे सांगितले. सेवानिवृत्त कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुण बावीस्कर यांनी आपण सर्व अधिसंख्य कर्मचारी एकत्र असल्यामुळेच सेवानिवृत्तीच्या व सेवाविषयक लाभ आपण मिळवू शकलो, असे सांगितले व अशीच एकजूट कायम ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रारंभी दीपप्रज्वलन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सूत्रसंचालन सचिव हेमराज सोनकुसरे यांनी केले.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बापुराव रोडे यांनी केले.



