चिपळूणच्या अंतर्गत रस्त्यांची चाळण; ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?’ नागरिकांचा संतप्त सवाल

दररोज सात ते आठ ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम; बांधकाम सभापती कपिल शिर्के यांची माहिती

चिपळूण : शहरातील अंतर्गत रस्त्यांची सध्या अक्षरशः चाळण झाली असून, अनेक भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?’ असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.

चिपळूण शहरातील गांधी चौक, कावीळतळी, उक्ताड, नारायण तलाव परिसरासह विविध भागांतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच प्रवासही त्रासदायक बनला आहे. त्यामुळे चिपळूण नगर परिषदेने शहरातील खराब रस्त्यांची पाहणी करून खड्डे तातडीने बुजवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतल्याची माहिती चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी दिली. शहरात ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणांची दररोज पाहणी करून सात ते आठ ठिकाणे निश्चित केली जात आहेत. त्यानंतर नगर परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत संबंधित भागात जाऊन खड्डे बुजवण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

“शहरातील खड्डे बुजवण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले आहे. दररोज सात ते आठ ठिकाणे निश्चित करून बांधकाम विभागाकडून त्या ठिकाणी खड्डे भरले जात आहेत. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे कपिल शिर्के यांनी स्पष्ट केले.

एकीकडे नगर परिषदेकडून खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता ही कामे किती वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण होतात, याकडे आता चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button