
“आपले सरकार पोर्टल” सेवा अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सलग दोन महिन्यांत राज्यात अव्वल
नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा पुरविण्यात व समाधानात राज्यात प्रथम
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनामार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ अंतर्गत आपले सरकार पोर्टल सेवेद्वारे विविध विभागांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन करण्यात येते. या मूल्यमापनामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून आणि जुलै या सलग दोन महिन्यांत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दलांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे.
रत्नागिरी पोलीस दलाची जूनमधील कामगिरी अशी : ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्विस म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच सर्विस विथ हायेस्ट सिटीजन स्कोरमध्येही रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम आले आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे एकूण १,७२३ विविध शासकीय सेवा पुरविण्याबाबतचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,६१० अर्जांचा वेळेत निपटारा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या सुविधेद्वारे मूल्यमापन करण्यात आलेल्या टाइमलेस स्कोरमध्ये १५.३२ तसेच आपले सरकार सर्विस विथ हायेस्ट सिटिझन स्कोरमध्ये १०.७२ इतके गुण मिळवून रत्नागिरी पोलीस दल आघाडीवर राहिले आहे.
जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे एकूण १,८०७ विविध शासकीय सेवा पुरविण्याबाबतचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,७१२ अर्जांचा यशस्वी निपटारा करण्यात आला होता. जुलैमध्ये ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्विस म्हणून पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला व सर्विस विथ हायेस्ट सिटीजन स्कोरमध्येही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अव्वल स्थान कायम राखले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या सुविधेद्वारे जुलैमध्ये मूल्यमापन केलेल्या टाइमले स्कोअरमध्ये ५०.६४ तसेच आपले सरकार सर्विस विथ हायेस्ट सिटिझन स्कोरमध्ये ३५.६६ इतके गुण मिळवून रत्नागिरी पोलीस दल आघाडीवर राहिले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या उद्देशाने केलेली आहे. तसेच भविष्यातही नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव प्रयत्नशील आहे.




