
दापोली तालुक्यातील अडखळ येथे दुर्दैवी अपघात; डंपरखाली चिरडून चालकाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी अपघातात डंपरखाली चिरडून चालकाचा मृत्यू झाला. नवनीत भिसे (वय ३०, रा. केळशी) असे मृत चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत भिसे हे खडी उतरवून आयशर डंपरमधून केळशीकडे परत जात होते. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अडखळ परिसरात रस्त्यालगतची साईड पट्टी अचानक खचल्याने डंपर मातीत रुतला.
वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी नवनीत भिसे खाली उतरले. मात्र त्याचवेळी मातीत अधिक खच ल्याने डंपर उजव्या बाजूला कलंडला आणि त्याखाली ते अडकून गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वाहनमालक मिथुन प्रकाश चिंचघरकर यांना क्लिनरने कळवले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने नवनीत भिसे यांना डंपरखालून बाहेर काढून तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे साडेचार वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत



