
राजापूरचा सुपुत्र ठरला देवदूत; भिवंडीतील इमारत दुर्घटनेत सहाय्यक आयुक्त अरविंद घुगरे यांचे धाडसी पाऊल
राजापूर : भिवंडी येथे ३१ जुलै रोजी घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेत राजापूरचे सुपुत्र तथा भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घुगरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. इमारत कोसळण्याच्या अवघ्या दहा मिनिटे आधी त्यांनी स्वतः इमारतीत प्रवेश करून रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने अनेक कुटुंबांचे प्राण वाचले.
राजापूर शहरातील आंबेवाडी येथील रहिवासी असलेले अरविंद घुगरे सध्या भिवंडी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ३१ जुलै रोजी सायंकाळी संबंधित इमारतीला मोठे तडे गेल्याची माहिती स्थानिक नगरसेवक यशवंत टावरे यांनी त्यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घुगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
धोक्याची पर्वा न करता त्यांनी स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन रहिवाशांना त्वरित बाहेर पडण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या सूचनेनुसार अनेक कुटुंबांनी तत्काळ इमारत रिकामी केली.
घुगरे आणि सर्व रहिवासी सुरक्षित बाहेर पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत इमारत कोसळली. त्यांच्या समयसूचकतेमुळे आणि धाडसी निर्णयामुळे मोठी जीवितहानी टळली. या कार्याबद्दल परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
इमारत दुर्घटनेनंतरही अरविंद घुगरे दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेत होते. संकटकाळात प्रशासनाची सतर्कता, तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि लोकसेवेची भावना किती महत्त्वाची असते, याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. राजापूरच्या या सुपुत्राच्या धाडसी कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




