महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्राविरोधात १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा

३६ पीडित महिलांचे तहसीलदारांना निवेदन; कर्जाची रक्कम मिळवून देण्याची मागणी

राजापूर : महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र या संस्थेकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत राजापूर तालुक्यातील ३६ महिलांनी येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, राजापूर यांना शुक्रवारी (३१ जुलै) सादर करण्यात आले.
निवेदनात महिलांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्राच्या प्रोप्रायटर सुमित्रा दत्तात्रय पाटील तसेच राजापूर शाखेच्या व्यवस्थापिका हर्षदा निलेश विचारे यांनी संगनमताने महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर बँकेमार्फत कर्जप्रकरण मंजूर करून घेण्यात आले आणि संबंधितांनी सांगितलेल्या बँक खात्यात पैसे वर्ग करून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काही महिन्यांत संस्थेकडून कच्चा माल उपलब्ध करून देण्यात आला. तयार माल स्वीकारल्यानंतर मिळणाऱ्या मोबदल्यातून बँकेच्या कर्जाचे हप्ते भरले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा व्यवहार पूर्णपणे बंद झाला असून वारंवार संपर्क साधूनही संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महिलांनी निवेदनात केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेकडून कर्जाची रक्कम मिळवून द्यावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे महिलांनी स्पष्ट केले आहे. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर एकूण ३६ महिलांच्या स्वाक्षऱ्या असून त्याची प्रत पालकमंत्री, राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button