
रत्नागिरी शहरातील भाट्ये ब्रेकवॉटर बंधार्याचे काम वेगात, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली भेट
रत्नागिरीच्या पर्यटन आणि मच्छीमारी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरणार्या भाट्ये येथील ब्रेकवॉटर बंधारा आणि भाट्ये खाडीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सोमवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी कार्यस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाचा दर्जा, प्रगती आणि सुरक्षिततेचा आढावा घेत संबंधित यंत्रणा व ठेकेदाराला आवश्यक सूचना दिल्या.
भाट्ये खाडी परिसरातील राजीवडा, जुवे, सोमेश्वर, भाट्ये, कर्ला आणि फणसोप या गावांतील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय मच्छीमारी आहे. मात्र, खाडीच्या मुखाशी वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौकावहनात अडथळे निर्माण होत होते.
विशेषतः ओहोटीच्या काळात मच्छीमारांना जीव धोक्यात घालून नौका बाहेर काढाव्या लागत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर शासनाने १४३ कोटी ९६ लाख ८१ हजार ३५५ निधी मंजूर करून
खाडीच्या मुखाशी १,०१६ मीटर लांबीचा ब्रेकवॉटर बंधारा उभारण्यास आणि गाळ काढण्यास मंजुरी दिली आहे. सध्या निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत काम सुरू असून, आतापर्यंत सुमारे ४०० मीटर बंधार्याचे काम पूर्ण झाले आहे.




