
ई-२० पेट्रोलविरोधात आंदोलन; वाहनचालक संसदेवर मोर्चा काढणार!
एएनआय, नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटीविरोधात ‘सीजेपी’चे आंदोलन संपल्यानंतर ‘दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशन’ने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात ४ ऑगस्टला हा मोर्चा काढला जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी दिली.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे देशभरातील वाहनांचे नुकसान होईल, असे सम्राट म्हणाले. लाखो मोटारसायकली, खासगी कार आणि टॅक्सी सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनांचा वापर करतात. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे या वाहनांचे एका रात्रीतून भंगारात रुपांतर होईल, अशी भीती सम्राट यांनी व्यक्त केली. नितीन गडकरी वाहतूकमंत्री झाल्यापासून आमच्यासमोर समस्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “आम्हाला १० वर्षांपेक्षा जास्त काळ त्रास होत आहे. आमच्या चिंतांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. इथेनॉल धोरणामुळे आम्हाला आर्थिक समस्या आणि मानसिक चिंता भेडसावत आहेत. इथेनॉलच्या नावावर आम्हाला ऊसाचा रस दिला जात आहे, त्यामुळे आमची वाहने नंतर बिघडतील. पण आमची मनःस्थिती आधीच बिघडली आहे.”
आम्हाला असे वाटते, आम्ही स्वतंत्र भारतात राहत नाही. आम्ही दुसऱ्या देशात आहोत किंवा आमच्या देशात आमचे सरकार नाही, जणू येथे एखाद्या परकीय सरकारची सत्ता आहे. – संजय सम्राट, अध्यक्ष, असोसिएशन




