
उद्धव ठाकरे रमले फोटोग्राफीच्या आठवणीत; फोटोग्राफीची व्याख्या, कॅमेरा ते रघु राय पर्यंतची सांगितली कहाणी!
मुंबई : छायाचित्र क्षण गोठवण्याची कला आहे. निर्जीव क्षणांना बोलके करण्याचे कसब छायाचित्रकाराकडे असते. सध्या फोटोग्राफीतील डेव्हलप शब्द गेला आहे. आता सगळे डिजिटल झाले आहे. छायाचित्रकाराने स्वत:चे छायाचित्र विकसित करण्याबरोबरच आपल्यासारखेच आणखीन छायाचित्रकार पुढे आणायला हवेत. आपल्याकडील कला इतरांना शिकवायला हवी, असा सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छायाचित्रकार या नात्याने दिला.
मुंबई प्रेस क्लब येथे शुक्रवारी छायाचित्रकार दिवंगत रजनीश काकडे यांनी असोसिएटेड प्रेस संस्थेसाठी टिपलेल्या ‘द आय दॅट नेव्हर क्लोजेस’ या निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. ‘रायटींग वुईथ लाईट’ अशी छायाचित्रकारितेची व्याख्या आहे. छायाचित्रकार त्याच्या छायाचित्रातून व्यक्त होतो. ही व्यक्त होण्याची कला आहे. छायाचित्रकार निर्जीव क्षणांना बोलके करतो. पण, त्याची महती कळेपर्यंत तो आपल्यातून निघून गेलेला असतो, असे काहीसे काकडे यांचे झाले आहे.
महागड्या कॅमेऱ्याने चांगली छायाचित्रे येतात, असा अनेकांचा समज आहे. पण, प्रत्येकाला महागडा पेन दिल्याने अक्षर सुंदर येईल असे होत नाही. आणि चांगले अक्षर आले तरी विचार आणि शब्द चांगले असतीलच असे नाही. छायाचित्रकाराला नशा हवी. छायाचित्रकारांचे अग्रणी असलेले रघु राय हे बाळासाहेबांची छायाचित्रे घेण्यासाठी ‘मातोश्री’ येथे आले होते. तेव्हा मी त्यांना जवळून पाहिले. अत्यंत साधा माणूस होता. छायाचित्रकाराने गर्दीत स्वत:ला वेगळे समजता कामा नये, अन्यथा त्याला तो क्षण टिपता येणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
छायाचित्रणाच्या माध्यमातून ऐतिहासिक घटना जतन होत असतात. मुंबईतील प्रमुख क्षण आणि महत्त्वाच्या टप्प्यांना समर्पित असे कायमस्वरूपी छायाचित्र दालन उभारण्याचा प्रस्ताव यावेळी ठाकरे यांनी मांडला. या दालनामुळे देशा-विदेशातील पर्यटकांना तसेच तरुण पिढीलाही मुंबईच्या इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, शिवसेना आमदार मिलींद नार्वेकर, असोसीएटेड प्रेसच्या विनीता प्रदीप, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस, सरचिटणीस राजेश मस्करान्हस, रजनीश यांचे बंधू राजू काकडे उपस्थित होते.
पत्रकारांपासून दूर राहतो
ठाकरे कुटुंबिय आणि पत्रकार यांचे अंत्यत जिव्हाळ्याचे संबध राहिले आहेत. मात्र मी अलीकडे पत्रकारांपासून दूर राहतो. त्याला काही कारणे आहेत, असे उद्धव म्हणाले. प्रेस क्लबच्या गच्चीवर हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुढील काही महिने दररोज दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यागतांसाठी खुले असेल.




